मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच युतीने निवडणुकीला सामोरे जात आहेत. उद्धवसेना-मनसेच्या या युतीने भाजपा महायुतीसमोर आव्हान उभे केले आहे. त्यात ठाकरे बंधू यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा मराठी आणि मराठी माणूस या भोवतीने असणार आहे. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपानेही रणनीती आखली आहे.
येत्या महापालिकेत विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडण्यासाठी काही नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह आसपासच्या परिसरात महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी या नेत्यांची खास हिंदुत्वावर भर देणार्या प्रचारसभा आयोजित केल्या जाणार आहेत. ठाकरे बंधू यांच्या मराठी विरुद्ध अमराठी या प्रचारात हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडून मराठीसोबतच इतर भाषिकांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह राज्यातील भाजपाचे नेते मंत्री नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याही आक्रमक सभा घेतल्या जाणार आहेत.
मुंबईसह वसई विरार, मीरा भाईंदर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर, सोलापूर यासह अनेक महापालिका निवडणुकीत हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रचारसभा घेणार आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच बटेंगे तो कटेंगे हा प्रचार पॅटर्न राबवला जाणार आहे. मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांची विधाने हिंदुत्वावर भर देणारी आहेत. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच मी पैदाच हिंदू म्हणून झालोय, हिंदू म्हणूनच माझी ओळख आहे. फक्त मतांसाठी हिंदुत्वाची शाल पांघरणारे आम्ही नाही. आमचे हिंदुत्व जनतेने पाहिलेले आहे आणि त्यांना ते मान्य आहेअसं सांगत ठाकरे बंधू यांच्या युतीवर टीका केली होती.
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांची काही दिवसांपासून विधाने हिंदुत्वाभोवती फिरताना दिसत आहेत. मीरा भाईंदरमध्ये कोळी बांधवांशी संवाद साधताना राणे यांनी समुद्रात हिरवे साप वळवळ करतायेत असं विधान केले होते. त्याशिवाय जो हिंदू हित की बात करेगा, वही आमची मुंबई पर राज करेगा असंही त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू यांच्या मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार करण्याचा प्लॅन भाजपाने आखल्याचे दिसून येते.